जुन्या दुचाकी वाहनांच्या खरेदी-विक्रीसाठी 'ओम्नीचॅनल' प्लॅटफॉर्म चालवणाऱ्या 'स्पीडिओ' (Speedioo) या स्टार्टअप कंपनीने आपल्या सीड फंडिंग राउंडमध्ये १० कोटी रुपयांचा निधी उभारला आहे. या गुंतवणुकीचे नेतृत्व आघाडीची अर्ली-स्टेज व्हेंचर कॅपिटल फर्म 'अॅटोमिक कॅपिटल' (Atomic Capital) ने केले आहे.
सागर पोटफोडे आणि अजित देशमुख यांनी सुरू केलेले 'स्पीडिओ' हे स्टार्टअप सध्याच्या स्पर्धात्मक बाजारपेठेत अत्यंत शिस्तबद्ध आणि फायदेशीर आर्थिक मॉडेलसह पुढे जात आहे. गेल्या १२ महिन्यांत, या स्टार्टअपने कोणतीही अतिरिक्त आर्थिक झीज सोसता (Cash Burn न करता) तब्बल ५ पटीने वाढ नोंदवली आहे. विशेष म्हणजे, कंपनी सध्या EBITDA-पॉझिटिव्ह आणि कॅश फ्लो-पॉझिटिव्ह (नफ्यात) आहे.
कंपनीने आतापर्यंत ३० कोटी रुपयांपेक्षा जास्त ग्रॉस मर्चेंडाईज व्हॅल्यू (GMV) पार केली असून, गेल्या वर्षभरात ४,००० हून अधिक वाहनांची यशस्वी विक्री केली आहे. सध्या मुंबई, पुणे आणि बेंगळुरू या शहरांमध्ये कंपनीचे २०० हून अधिक डीलर पार्टनर्स कार्यरत आहेत.